नातेपुते येथील कोरटकर कुटुंबीय अडकले शारजात

माजी आमदार राम सातपुते यांच्या संपर्कात संजय कोरटकर
नातेपुते (बारामती झटका) लोकमत साभार
नातेपुते, ता. माळशिरस येथील प्रसिद्ध उद्योजक संजय कोरटकर, त्यांचा मुलगा रणवीर कोरटकर आणि सून हे सध्या दुबई पर्यटनासाठी गेले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे ते अडकले आहेत. ते सध्या सुरक्षित असून शारजा या शहरात आपल्या मुलगी आणि जावयाकडे वास्तव्यास असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
माजी आमदार राम सातपुते यांच्या थेट संपर्कामध्ये संजय कोरटकर आहेत. तेथील सर्व परिस्थिती माजी आमदार राम सातपुते यांनी जाणून घेतलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य सांगितलेले आहे. त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्री यांनी आश्वासित केलेले आहे..
कोरटकर कुटुंब आपल्या दुबईत राहणाऱ्या मुलीकडे आणि जावयाकडे फिरण्यासाठी गेले होते. मात्र, अचानक उद्भवलेल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे आणि ड्रोन हल्ल्यांच्या सावटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुबईपासून साधारण २० किलोमीटर अंतरावर असलेल्या शारजा शहरात त्यांची मुलगी तेजल कोरटकर आणि विश्वजित जाधव राहतात. सद्यःस्थितीत हे कुटुंब सुरक्षित ठिकाणी आहे.
संजय कोरटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते ज्या हॉटेलमध्ये पूर्वी थांबले होते, त्या हॉटेलवरही हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुबई विमानतळावर परतण्यासाठी गेलेले असताना तिथे प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. सुमारे ५० हजार नागरिक विमानतळावर अडकून पडल्याने विमान प्रवास सध्या विस्कळीत झाला आहे.
भीतीचे सावट; पण सुरक्षित
संजय कोरटकर यांनी कळवले आहे की, आम्ही सध्या सुरक्षित आहोत; परंतु परिसरात वारंवार होणारे बॉम्बस्फोट आणि ड्रोन हल्ल्यांचे आवाज ऐकू येत असल्याने मनात मोठी भीती आहे. विमानतळावरील गर्दी आणि एकूणच तणावामुळे आम्ही सध्या शारजा येथील घरातच थांबणे पसंत केले आहे. सध्या हे कुटुंब संपर्कात असून परिस्थिती निवळण्याची वाट पाहत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



