ताज्या बातम्यासामाजिक

लवंग गाव व परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांबाबत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

लवंग (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील लवंग गाव व परिसरात अलीकडील काळात वारंवार चोरीच्या घटना घडत असून, शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींकडून केळीसह विविध पिकांचे नुकसान करणे, शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाईपलाईन फोडणे, विद्युत केबल कापणे, बोअरवेलच्या मोटारींची तोडफोड करणे तसेच इतर शेतीसाहित्याचे नुकसान करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आर्थिक फटका देखील बसत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत लवंगचे कृषी मित्र विनोद भोसले, प्रगतशील बागायतदार सोमनाथ भोळे आणि डॉ. सचिन चव्हाण यांनी अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी वाळके साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी लवंग व परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटना, शेतपिकांचे होत असलेले नुकसान तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.

प्रतिनिधींनी परिसरात रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करावी, चोरी व तोडफोड करणाऱ्या व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल अशा प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी वाळके साहेब यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन लवंग व परिसरात योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच गस्त वाढवून चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

लवंग हे वारकरी परंपरा, सामाजिक ऐक्य आणि प्रगत बागायती शेतीसाठी ओळखले जाणारे गाव आहे. त्यामुळे गावाची शांतता व शेतकऱ्यांची सुरक्षितता कायम राखण्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button