ताज्या बातम्यासामाजिक

धार्मिक कार्यासोबत समाजसेवेचा आदर्श; सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजींचा श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय सन्मान

शिक्षण, समाजसेवा, धार्मिक, सांस्कृतिक व मानवतावादी कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

वेळापूर (बारामती झटका)

शिक्षण, समाजसेवा, धार्मिक, सांस्कृतिक आणि मानवतावादी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘द ग्लोबल अचीव्हर्स पुरस्कार २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने श्री. ष.ब्र. १०८ सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांचा श्रीलंकेत गौरव करण्यात आला. धार्मिक व आध्यात्मिक कार्यासोबतच समाजातील वंचित, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सातत्याने करण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची दखल घेत त्यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.

श्रीलंकेतील कोलंबो येथील पेगॅसस रीफ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. यामध्ये श्री. ष. ब्र. १०८ सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांच्या बहुआयामी कार्याची विशेष दखल घेण्यात आली.

सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रमुख कार्य धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्राशी निगडित असले, तरी ‘समाजाचे आपण सेवक आहोत’ या भावनेतून त्यांनी समाजसेवेचा व्यापक आदर्श निर्माण केला आहे. अध्यात्माच्या माध्यमातून समाजप्रबोधन करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे.

समाजात वाढत चाललेली व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, पाखंडपणा तसेच विविध सामाजिक अनिष्ट प्रथा यांच्याविरोधात जनजागृती करण्याचे कार्य ते करीत आहेत. धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांबरोबरच विवेक, सामाजिक जबाबदारी, नैतिक मूल्ये आणि मानवतावादी दृष्टिकोन समाजात रुजविण्यावर त्यांचा भर आहे. शिक्षण क्षेत्रातही त्यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. मठाच्या माध्यमातून गुरुकुल चालवून विद्यार्थ्यांना संस्कारक्षम, मूल्याधिष्ठित आणि जीवनोपयोगी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आणि समाजहिताची जाणीव निर्माण करणारे माध्यम ठरावे, या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी करण्यात येणारे हे कार्य अनेक कुटुंबांसाठी आधार ठरत आहे.

समाजातील अत्यंत गरजू घटकांसाठीही विविध मदतकार्य सातत्याने सुरू आहे. फुटपाथवर तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गरजू व्यक्तींना अन्न आणि वस्त्रदान केले जाते. त्याचबरोबर गरीब व गरजू कुटुंबातील विवाह सोहळ्यांसाठी आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्यही त्यांच्या माध्यमातून केले जात आहे.

धार्मिक कार्याला समाजसेवेची जोड देत शिक्षण, सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक जतन आणि मानवतावादी उपक्रमांना प्राधान्य देणाऱ्या सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजींच्या या बहुआयामी कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ‘द ग्लोबल अचीव्हर्स पुरस्कार २०२६’ हा सन्मान श्रीलंकेत प्रदान करण्यात आला.

या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रासोबतच शिक्षण, समाजसेवा आणि मानवतावादी कार्याचीही आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे. समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि सामाजिक अनिष्ट प्रथांविरोधात जनजागृती करणे या कार्याला मिळालेला हा गौरव समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button