सातारचं माहेर, पुण्याचं सासर अन ब्रिटनची डिग्री ! हर्षदा देशमुख जाधव ठरल्या पहिल्या महिला पदवीधर आमदार

लोधावडे (बारामती झटका)
विधान परिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या लढतीत महाविकास आघाडीच्या (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्ष) उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी पहिल्याच निवडणुकीत यशाचा गुलाल उधळला आहे. महायुतीच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत त्यांनी विजय निश्चित केला आहे. या ऐतिहासिक विजयामुळे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुण्याच्या राजकीय वर्तुळात हर्षदा देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे.
माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या त्या कन्या आहेत. प्रभाकर देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत साताऱ्यातील माण-खटाव मतदारसंघातून प्रभाकर देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. भाजपचे जयकुमार गोरे यांच्याविरुद्ध झालेल्या त्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात देशमुखांना ८८,४२६ मते मिळाली होती, मात्र अवघ्या ३,०४६ मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता. वडिलांचे तेच अधुरे स्वप्न आणि पराभवाची सव्याज परतफेड करत लेक हर्षदा यांनी थेट विधान परिषदेत धडक मारली आहे.
हर्षदा देशमुख यांच्या या यशामुळे नवे राजकीय विक्रम प्रस्थापित झाले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार ठरणार आहेत. तसेच या मतदारसंघातून विधान परिषदेत पोहोचणाऱ्या त्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण आमदार ठरल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या या यशामुळे विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची ताकद अधिक मजबूत झाली आहे. उच्चशिक्षित अन् तगडा प्रशासकीय-शैक्षणिक अनुभव हर्षदा देशमुख यांचा प्रवास केवळ राजकीय वारशापुरता मर्यादित नसून त्यांनी उच्च शिक्षणाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शिक्षण : पुण्याच्या प्रसिद्ध व्हीआयटी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी, पुणे विद्यापीठातून एम.ई. आणि ब्रिटनमधील नामांकित क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटीमधून ‘फायनान्स अँड मॅनेजमेंट’ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. पुण्याच्या ‘केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’ (ट्रिनिटी ग्रुप) च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पंढरपूर येथे जन्म, सांगलीतील आजोळ, कोल्हापुरातील शिक्षण, साताऱ्यातील माण-लोधवडे हे माहेर आणि सासर पुणे… अशा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांशी हर्षदा यांचे जवळचे नाते राहिले आहे.
या व्यापक कौटुंबिक व सामाजिक संबंधांमुळे, तसेच पदवीधरांच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण मतदारसंघातून त्यांना भक्कम पाठबळ मिळाले. वडिलांचा प्रशासकीय अनुभव, शरद पवारांचे राजकीय मार्गदर्शन आणि स्वतःची उच्च शैक्षणिक पार्श्वभूमी याच्या बळावर हर्षदा देशमुख-जाधव यांनी हे महत्त्वाचे मैदान मारले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



