बारामतीत बालदिन व ‘नॅशनल न्यूबॉर्न केअर वीक’ उत्साहात साजरा

नवजात शिशूंची काळजी, लसीकरण व बालआरोग्याबाबत पालकांना मार्गदर्शन
बारामती (बारामती झटका)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथील बालरोग चिकित्सा शास्त्र विभागाच्या वतीने बालदिन आणि ‘नॅशनल न्यूबॉर्न केअर वीक’ उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत नवजात शिशूंची काळजी, सुरक्षितता, स्वच्छता, लसीकरण आणि बालआरोग्याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी १५ ते २१ नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रीय नवजात शिशू काळजी सप्ताह साजरा केला जातो. यानिमित्त बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग विभागात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. नवजात बालकांची काळजी आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेविषयी पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी बालरोग चिकित्सा शास्त्र विभागप्रमुख डॉ. समीर पवार आणि अधिसेविका श्रीमती सीमा माने उपस्थित होत्या. कार्यक्रमात डॉक्टर व परिचारिकांनी पालकांना नवजात बालकांचे संगोपन, स्वच्छता, लसीकरण तसेच बालकांच्या सुरक्षिततेविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्रसिद्ध जादूगार शिवम (शिवम मॅजिशियन) यांचा विशेष जादूचा प्रयोग आयोजित करण्यात आला. या प्रयोगाचा लहान मुलांनी मनमुराद आनंद घेतला. याशिवाय बालकांचे आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकास याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहनही करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालरोग विभागातील सर्व प्राध्यापक, निवासी डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पालक आणि लहान मुलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कार्यक्रमाची सांगता झाली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



