माझ्या जीवनाला दिशा देणारे प्रा. डॉ. सुभाष वाघमारे – पोपट नामदेव धायगुडे

सातारा (बारामती झटका)
शरदचंद्र पवार महाविद्यालय, लोणंद येथे मी एफ.वाय.बी.ए.ला प्रवेश घेतला, त्या वेळी माझ्यासमोर आयुष्याचे कोणतेही ठोस ध्येय नव्हते. फक्त कॉलेज करायचे, शिक्षण घ्यायचे एवढेच माहीत होते. मात्र, नवीन गोष्टी शिकण्याची आणि त्या जीवनात आत्मसात करण्याची माझी वृत्ती होती. याच वृत्तीमुळे माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आणि या प्रवासात मला लाभलेले महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. डॉ. सुभाष वाघमारे सर.
महाविद्यालयात ‘महाराष्ट्र विवेक वाहिनी’ हा उपक्रम सुरू होणार असल्याचे समजले. मी सरांना भेटून त्याविषयी माहिती घेतली आणि त्यात सहभागी झालो. तेथून माझ्या विचारांच्या प्रवासाला सुरुवात झाली.
विवेक म्हणजे काय, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, अंधश्रद्धा आणि अविवेकी विचारांकडे चिकित्सकपणे कसे पाहायचे, समाजाप्रती आपली जबाबदारी काय, हे मला समजू लागले. डॉ. नरेंद्र दाभोळकर, हमीद दाभोळकर, शैला दाभोळकर आणि अन्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या विचारविश्वाची ओळख झाली. गटचर्चा, प्रशिक्षण शिबिरे, व्यसनमुक्तीचे उपक्रम यांत मी सहभागी होत गेलो. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत काम करण्याची संधीही मला मिळाली.
महाविद्यालयातील भित्तीपत्रिकेच्या संपादनाचे कामही मी केले. लेख, विचार आणि सुविचार लिहिणे, त्यांचे संकलन व मांडणी करणे, अशी कामे मी उत्साहाने करीत असे. या कामातून माझ्या लेखनाला आणि विचारांना दिशा मिळाली. कोणतेही काम दिले की ते पूर्ण करण्याची सवय याच काळात अधिक दृढ झाली.
‘आपला विकास आपल्याच हाती’ आणि ‘हक्क हवेतच, पण कर्तव्य आधी’ ही विचारधारा माझ्या जीवनाचा भाग बनली.
त्या काळात माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत साधारण होती. कॉलेज करताना मी लाईट फिटिंगची कामे करीत होतो. माझे आई-वडील दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जात होते. स्वतःच्या पोटासाठी कोणतेही काम करण्याची मला लाज नव्हती. पण मनात एकच इच्छा होती—एक दिवस आपल्या आई-वडिलांना सुख द्यायचे.
एस.वाय.बी.ए.मध्ये असताना उत्पन्नाचा विश्वासार्ह स्रोत नव्हता. मी सरांशी चर्चा केली. त्यातून एलआयसी एजन्सी घेण्याचा मार्ग मिळाला. पुढे एलआयसीमधील एन. डी. पाटील यांनीही माझ्यातील माणसे जोडण्याची क्षमता ओळखून मला प्रोत्साहन दिले.
मी मेहनत सुरू केली. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा यांची साथ घेतली. हळूहळू परिस्थिती बदलत गेली. घर बांधले. विविध प्रशिक्षण घेतले. एलआयसीच्या पॉलिसी संकलनात सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. पुढे देशभरातील सुमारे १४ लाख एजंटांमध्ये टॉप १०० मध्ये स्थान मिळाले. आज माझ्यासोबत पाच कर्मचारी काम करतात.

पण आर्थिक यश मिळाले म्हणून मी माझी सुरुवात विसरलो नाही. समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे, ही जाणीव मनात राहिली. म्हणून शाळा आणि संस्थांना कपाटे, कॉम्प्युटर तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी माझ्या परीने मदत करत आलो.
सरांनीही मला अनेक कठीण प्रसंगी आधार दिला. आयुष्यात चढ-उतार आले तेव्हा त्यांनी मला धीर देत सांगितले, “अशा वयात या गोष्टी होतात. त्या सोडून दे आणि पुढे चालत राहा.” त्या शब्दांनी मला पुन्हा उभे राहण्याचे बळ दिले.
आई-वडिलांना विमानात बसवण्याचे स्वप्न
एलआयसीच्या कामासाठी पहिल्यांदा विमानाने दिल्लीला जाण्याची संधी मला मिळाली. त्यापूर्वी विमान मी फक्त आकाशात पाहिले होते. विमानात बसलो आणि मनात एकच विचार आला—“मी विमानात बसलो, पण माझे आई-वडील? त्यांनी आयुष्यभर मजुरी केली. त्यांनाही एकदा विमानात बसवायचे.”
मी मनाशी निर्णय घेतला.
२०१८ मध्ये एलआयसीमार्फत अमेरिकेला जाण्यासाठी माझी निवड झाली होती. त्यापूर्वी आई-वडिलांना दिल्ली दाखवायची, असे ठरवले. ऑक्टोबर २०१७ मध्ये ६ ते १० जानेवारी २०१८ या कालावधीची विमानाची तिकिटे काढली. पत्नीला माझी इच्छा सांगितली. तिनेही मला पूर्ण साथ दिली.
आई-वडिलांना तिकिटे दाखवली तेव्हा त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.
माझे वडील नामदेव धायगुडे काही दिवसांपूर्वी आजारी पडले होते. तरी मुलगा विमानाने दिल्लीला नेणार आहे, हे ऐकून त्यांचा उत्साह वाढला.
६ जानेवारीला पहाटे पुण्याहून विमान उडाले. विमानतळावरील प्रत्येक गोष्ट माझे वडील लहान मुलासारखे कौतुकाने पाहत होते. विमान आकाशात झेपावले आणि माझ्या मनात एकच समाधान होते—माझ्या आई-वडिलांचे एक स्वप्न आज माझ्यामुळे पूर्ण होत आहे.
दिल्ली, आग्रा, ताजमहाल, आग्रा किल्ला, मथुरा, राजघाट, इंडिया गेट, कुतुबमिनार, लोटस टेम्पल अशा अनेक ठिकाणी आम्ही गेलो. राहण्यासाठी मी चांगल्या हॉटेलची व्यवस्था केली होती.
ताजमहाल पाहून वडील म्हणाले,
“संगमरवरी दगडाने बांधलेला तो ताजमहाल पाहिला आणि डोळ्याचे पारणे फिटले.”
विमानप्रवासाविषयी ते गावात परतल्यावर लोकांना सांगत होते, “विमानात १६० माणसे असतात. चहा, कॉफी, नाश्ता सर्व मिळतो. चिरंजीवाने कमाल केली!”त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान माझ्यासाठी आयुष्यातील सर्वांत मोठे पारितोषिक होते. आज माझी आई या जगात नाही. २ मार्च रोजी तिचे निधन झाले. तिच्या जाण्यानंतर त्या दिल्लीच्या प्रवासाची आठवण अधिकच मनाला भिडते. आई-वडिलांसाठी आपण केलेला तो प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वांत मौल्यवान आठवणींपैकी एक आहे.
मळोलीच्या वस्तीला पाण्याची टाकी
माझ्या आणि वाघमारे सरांच्या नात्यात केवळ गुरु-शिष्याचे नाते नाही, तर एकमेकांच्या सुख-दुःखात उभे राहण्याची आपुलकी आहे.
सरांच्या जन्मगाव मळोली येथे एकदा तीव्र पाण्याचा दुष्काळ पडला होता. एका वस्तीमध्ये बोअर होते; पण पाणी साठवण्यासाठी टाकी नव्हती. त्यामुळे पाण्याची मोठी अडचण होती. सरांनी मला परिस्थिती सांगितली आणि विचारले, “पोपट, तू हे करू शकशील का?” मी कोणतेही आढेवेढे न घेता होकार दिला. त्या ठिकाणी पाण्याची टाकी करून दिली आणि नळाद्वारे लोकांना पाणी भरून नेता येईल, अशी सुसज्ज व्यवस्था केली. त्यामुळे त्या वस्तीतील लोकांची पाण्याची अडचण दूर झाली. सरांनी आयुष्यभर मला दिलेल्या मार्गदर्शनाच्या ऋणातून समाजासाठी काही करता आले, याचे मला समाधान वाटले.
या कार्याबद्दल समता प्रतिष्ठान, मळोली यांच्या वतीने सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आमदारांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला आणि गौतम बुद्धांची प्रत भेट देण्यात आली. हा सन्मान माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. यासाठी वाघमारे सरांचे आणि समता प्रतिष्ठान, मळोलीच्या सर्व सदस्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
गुरुंचे ऋण
माझ्या आयुष्यात मी जे काही मिळवले, त्यात माझ्या मेहनतीचा वाटा आहेच; पण योग्य वेळी दिशा देणाऱ्या वाघमारे सरांचा वाटा मी कधीही विसरू शकत नाही. सरांनी मला केवळ विषय शिकवला नाही; विचार करायला, स्वावलंबी व्हायला, संकटातून पुढे जायला आणि समाजासाठी काहीतरी करायला शिकवले. सरांनी माझ्याविषयी ‘आधुनिक श्रावणबाळ’ म्हणून लिहिले, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण खरे तर माझ्या आई-वडिलांना दिलेला तो आनंद हा माझा कर्तव्यभाव होता. त्यांनी आयुष्यभर माझ्यासाठी कष्ट केले; मी त्यांच्या आयुष्यातील काही दिवस आनंदाचे करू शकलो, एवढेच.
आजही सर एखाद्या पुस्तकासाठी, सामाजिक उपक्रमासाठी किंवा गरजू कामासाठी मदत मागतात, तेव्हा माझ्या परीने मदत करण्याचा मी प्रयत्न करतो. कारण ही केवळ मदत नसून माझ्यासाठी गुरुदक्षिणेचा एक छोटासा प्रयत्न आहे.
सर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक नियोजनाबाबत, मेडिक्लेमबाबत किंवा इतर आर्थिक बाबतीत काही मार्गदर्शन करण्याची संधी मिळते, तेव्हाही मला आनंद होतो. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.
माझ्या जीवनाकडे मागे वळून पाहताना मला जाणवते—
गरीबीने मला कष्ट शिकवले, विवेक वाहिनीने विचार दिला, भित्तीपत्रिकेने लेखनाची दिशा दिली, वाघमारे सरांनी जीवनाची दिशा दिली, एलआयसीने स्वावलंबन दिले आणि माझ्या आई-वडिलांनी जगण्याची प्रेरणा दिली. आज मी जे काही आहे, त्यामध्ये या सर्वांचा वाटा आहे.
माझ्या गुरुंना मी मनापासून सांगू इच्छितो—
सर, आपण मला विद्यार्थी म्हणून घडवलेत; आयुष्यभर मी आपल्या या ऋणात राहीन. आपल्या एका शब्दावर समाजासाठी काही करता आले, तर त्याला मी माझे भाग्य समजेन.
आणि प्रत्येक मुलाला माझी एकच विनंती—
आई-वडील जिवंत असताना त्यांना वेळ द्या. पैसा पुन्हा कमावता येतो; पण गेलेला वेळ आणि गेलेली माणसे पुन्हा मिळत नाहीत.
माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर विमानात बसताना दिसलेला आनंद आणि माझ्या गुरुंच्या डोळ्यांत माझ्याविषयी दिसलेले समाधान— हीच माझ्या आयुष्याची खरी कमाई आहे.
प्रा. डॉ. सुभाष वाघमारे सरांना मनःपूर्वक प्रणाम!
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



