मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथील जाहीर सभा रद्द होणार…

महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी व अकाली मृत्यूमुळे महाराष्ट्रात शोककळा..
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बुधवार दि. 28 जानेवारी 2026 रोजी मुंबई येथून विमानाने बारामती येथे आल्यानंतर विमानतळावर 8.45 वाजता विमान उतरवत असताना हवामानात धुके असल्याने वैमानिकांचा अंदाज चुकून धावपट्टीवर विमान न उतरता दुसरीकडे उतरल्याने विमानाचा कोसळून स्फोट होऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह इतरांचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी व अकाली मृत्यूमुळे महाराष्ट्रात शोककाळा पसरलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी बारामती येथे येऊन अजितदादांच्या पार्थिव देहाचे अंतिम दर्शन घेऊन पवार परिवार यांच्या दुःखामध्ये सहभागी झालेले होते…
महाराष्ट्रामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व सहयोगी पक्षांचे मिळून महायुतीचे सरकार आहे. सरकारमधील सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार असून महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पदावर होते. अजितदादांच्या अकाली मृत्यूमुळे शासनाने तीन दिवसाचा दुखवटा जाहीर केलेला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजलेले होते. अजितदादा पवार बारामती येथे प्रचाराच्या शुभारंभाकरिता येत होते, त्यावेळी त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. सरकारमधील सहयोगी असणारा पक्षाचा नेता व राजकारणातील जीवाभावाचा मित्र असणारे अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अनेक जाहीर सभा रद्द केलेल्या आहेत. माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगाने दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी एक वाजता फोंडशिरस, ता. माळशिरस येथे जाहीर सभा होणार होती मात्र, महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची फोंडशिरस येथील जाहीर सभा रद्द झालेली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून खात्रीलायक वृत्त हाती आलेले आहे…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार दि. 28 जानेवारी 2026 रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी व भारतीय जनता पक्षाने तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ रॅली, कॉर्नर सभा सर्व रद्द केलेले होते. माळशिरस तालुक्यातील गावोगावच्या पक्ष कार्यालयामध्ये अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन करून शोक व्यक्त करण्यात आलेला होता. माजी आमदार राम सातपुते यांनी वेळापूर येथील शोकसभेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अजितदादांना श्रद्धांजली वाहिलेली होती…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



