मा. आ. राम सातपुते यांची वीज पडून मृत्यू पावलेल्या स्व. सौ. करिष्मा तांबवे यांच्या परिवारांची सांत्वन पर भेट..

नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते, ता. माळशिरस येथील सौ. करिष्मा विकास तांबवे यांचा अंगावर वीज पडून आकस्मित दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. स्व. सौ. करिष्मा विकास तांबवे यांच्या परिवारांची सांत्वन पर भेट माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते यांनी घेतली. यावेळी ॲड. भानुदास राऊत, रावसाहेब पांढरे, राजाभाऊ पांढरे, रोहित उर्फ बादल सोरटे आदी उपस्थित होते.
नातेपुते येथील डॉ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशालेमधील सेवानिवृत्त शिक्षक वसंत तांबवे सर यांची दोन मुले व दोन सुना दहिगाव रोडवरील ४४ फाटा येथील शेतामध्ये गेलेले होते. अचानक वादळी वारा व पावसाला सुरुवात झाली. आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे तांबवे परिवारातील सदस्य शेतातून घराकडे येत होते. एकापाठोपाठ सर्व सदस्य चालत येत होते. विजांचा कडकडाट सुरू होता. वाऱ्यामुळे स्वर्गीय सौ. करिष्मा तांबवे यांच्या डोक्यावरील टाॅवेल बाजूला पडला. टॉवेल घेईपर्यंत पती, दीर व जाऊ काही अंतरावर पुढे गेल्या आणि तेवढ्यात करिष्मा तांबवे यांच्या अंगावर वीज पडली. सोबत असणाऱ्या तिघांनाही विजेचा धक्का बसला मात्र, करिष्मा तांबवेच फक्त गतप्राण झाल्या.

स्व. सौ. करिष्मा तांबवे यांचे वय ३२ आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. नातेपुते पंचक्रोशीत वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि संपूर्ण नातेपुते परिसरावर दुःखाची शोककाळा पसरली. सेवानिवृत्त शिक्षक वसंत तांबवे यांच्या त्या सुनबाई होत्या. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आलेले होते.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी सौ. करिष्मा विकास तांबवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तांबवे परिवार यांच्या दुःखात सहभागी झाले होते. स्व. सौ. करिष्मा यांचा नैसर्गिक मृत्यू झालेला असल्याने प्रशासनाला सूचना केल्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.