स्वातंत्र्यदिनी साहित्यवेल प्रकाशनचे वाचन प्रसार अभियान

वाचनदीप व्हा!’ उपक्रमाचा प्रारंभ; राज्यात व्यापक वाचन चळवळ उभी करण्याचा संकल्प
वाचन प्रेरक व्हा!” — प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांचे नागरिकांना आवाहन
सातारा (बारामती झटका)
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२६ पासून साहित्यवेल प्रकाशन, सातारा यांच्या वतीने ‘साहित्यवेल वाचन चळवळ’ या विशेष वाचन प्रसार अभियानास प्रारंभ करण्यात येणार आहे. राज्यात व्यापक वाचन चळवळ उभी राहण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन वाचन प्रसाराचे कार्य करावे, असे आवाहन साहित्यवेल प्रकाशन, सातारा चे संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले आहे. समाजामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, वाचनसंस्कृती रुजविणे आणि वाचनाच्या माध्यमातून ज्ञानी, विचारी व सदाचारी समाज घडविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
आजच्या डिजिटल युगात माहितीचा प्रचंड स्फोट झाला आहे. मोबाईल, इंटरनेट आणि सामाजिक माध्यमांमुळे क्षणार्धात असंख्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचते; मात्र माहिती मिळणे आणि ज्ञान प्राप्त होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सामाजिक माध्यमांवरील प्रत्येक माहिती सत्य असेलच असे नाही. अफवा, अर्धसत्य, चुकीची माहिती आणि दिशाभूल करणारा मजकूर वेगाने प्रसारित होत असताना सत्य-असत्याची चिकित्सा करण्याची, योग्य-अयोग्य ओळखण्याची आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी वाचन अधिक आवश्यक झाले आहे.
वाचन माणसाला केवळ माहिती देत नाही, तर प्रश्न विचारण्याची, कारणमीमांसा करण्याची, विविध दृष्टिकोन समजून घेण्याची आणि चिकित्सकपणे विचार करण्याची क्षमता विकसित करते. साहित्य माणसाची कल्पनाशक्ती व संवेदनशीलता समृद्ध करते; इतिहास भूतकाळ समजून घेण्याची दृष्टी देतो; विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करते; संविधान आणि लोकशाहीविषयक साहित्य नागरिकत्वाची जाणीव दृढ करते; तर चरित्रे व आत्मचरित्रे संघर्ष, जिद्द आणि मूल्यांची प्रेरणा देतात. त्यामुळे वाचन ही केवळ वैयक्तिक सवय नसून सुजाण नागरिक घडविण्याची आणि समाजाची वैचारिक जडणघडण करण्याची प्रक्रिया आहे.
वाचनाची व्याप्तीही व्यापक असावी, असा या चळवळीचा आग्रह आहे. कथा-कादंबऱ्यांबरोबरच मराठी साहित्य, भारतीय व जागतिक साहित्य, चरित्रे व आत्मचरित्रे, इतिहास, संविधान व लोकशाही, समाजशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, अर्थशास्त्र, शेती, शिक्षण, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, कला-संस्कृती, आरोग्यविषयक सामान्य माहिती आणि समकालीन सामाजिक प्रश्न अशा विविध क्षेत्रांतील साहित्य वाचणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबर विज्ञान, साहित्य, चरित्रे आणि प्रेरणादायी पुस्तके वाचावीत. शिक्षकांनी विषयाच्या पलीकडे जाऊन साहित्य, समाज, शिक्षण आणि संशोधनविषयक ग्रंथ वाचावेत. तरुणांनी विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योजकता, कौशल्यविकास, संविधान आणि समकालीन जग समजून घेण्यासाठी वाचन करावे. ज्येष्ठ नागरिकांनी इतिहास, चरित्रे, आत्मचरित्रे आणि साहित्याच्या माध्यमातून आपले अनुभव पुढील पिढीपर्यंत पोहोचवावेत.
वाचनात विविधता असणे तितकेच महत्त्वाचे आहे. एकाच विचाराचा किंवा एका विषयाचा आग्रह न धरता भिन्न विचारांचे, विविध क्षेत्रांचे आणि वेगवेगळे दृष्टिकोन मांडणारे साहित्य वाचल्याने दृष्टी व्यापक होते. मतभिन्नता समजून घेण्याची क्षमता वाढते आणि कोणत्याही विषयाकडे अधिक संतुलितपणे पाहता येते. म्हणूनच या चळवळीचा संदेश “विविध वाचा, समजून वाचा, विचारपूर्वक वाचा आणि वाचलेले हितकारक आचरणात आणा.” असा आहे.
‘साहित्यवेल वाचन चळवळी’चा मुख्य संदेश ‘वाचनदीप व्हा!’ असा असून, प्रत्येकाने स्वतः वाचावे आणि आपल्या आसपासच्या माणसांमध्येही वाचनाची आवड निर्माण करावी, असा प्रयत्न करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांनी दररोज किमान अर्धा तास अवांतर वाचन करावे, दर महिन्याला एक नवीन पुस्तक विकत घेऊन वाचावे आणि वर्षाला किमान १२ पुस्तके वाचावीत, असा संकल्प करण्यात येणार आहे. वाचन ही अधूनमधून केली जाणारी कृती न राहता ती जीवनशैलीचा भाग बनावी, हा या संकल्पामागील उद्देश आहे.
वाचन प्रसाराचे कार्य व्यापक पातळीवर नेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक आणि सेवाभावी कार्यकर्ते यांची नोंदणी करून वाचन प्रेरकांचे संघटन उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर शाळा-महाविद्यालये, शिक्षण संस्थांचे संचालक, स्वयंसेवी संघटना तसेच सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या सहकार्याने वाचन कट्टे, सामूहिक वाचन, पुस्तक परिचय, पुस्तक चर्चा, पुस्तक देवाणघेवाण, पुस्तक दान, कथाकथन आणि वाचन प्रेरणा यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या चळवळीला केवळ उपक्रमांचे स्वरूप न राहता वाचकांचा सक्रिय समुदाय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी वाचक मेळावे आयोजित करण्यात येतील. नियमित वाचन करणाऱ्या व्यक्तींच्या वाचनवेडाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. वाचन प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वाचन प्रेरकांच्या योगदानाचा गौरव केला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी वाचनावर आधारित परीक्षा, प्रश्नमंजुषा, पुस्तक परिचय आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाईल. चळवळीत सहभागी होणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या विचारविनिमयातून स्थानिक गरजा लक्षात घेऊन नवे उपक्रम निश्चित करून ते सातत्याने राबविण्यात येणार आहेत.

वाचनातून व्यक्ती घडते आणि व्यक्तींच्या विचारातून समाजाची दिशा ठरते, या भूमिकेतून या चळवळीची वैचारिक पायाभरणी करण्यात आली आहे. वाचनातून ज्ञान मिळते, ज्ञानातून विचार विकसित होतो, विचारातून विवेक निर्माण होतो आणि विवेकातून सम्यक आचाराची दिशा मिळते. सम्यक आचार अंगीकारणाऱ्या व्यक्तींच्या समूहातून सदाचारी समाज घडू शकतो. म्हणूनच साहित्यवेल वाचन चळवळीचे तत्त्ववाक्य “वाचनातून ज्ञान, ज्ञानातून विचार; विचारातून विवेक, विवेकातून सम्यक आचार आणि सम्यक आचारातून सदाचारी समाज!” असे निश्चित करण्यात आले आहे.
या अभियानात सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे. शाळा-महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, सेवाभावी कार्यकर्ते, शिक्षण संस्थांचे संचालक, स्वयंसेवी संघटना तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन या वाचन चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन साहित्यवेल प्रकाशन, सातारा चे संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने योगदान दिल्यास वाचनाची चळवळ घराघरांत, शाळा-महाविद्यालयांत आणि गावागावांत पोहोचू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“स्वतः वाचा, इतरांना वाचायला प्रवृत्त करा आणि वाचनाची ज्योत मनामनात पेटवा!” या संदेशासह “वाचन प्रेरक व्हा!” आणि ज्ञानी, विचारी व सदाचारी पिढी घडविण्याच्या या उपक्रमात सहभागी व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाचन प्रसारासाठी कार्य करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी ९८९०७२६४४० या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करावी, असे कळविण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



