पुण्यात नोटा तयार करून माढा, करमाळ्याच्या बाजारात विक्री करणाऱ्या चौघांना केले जेरबंद
वेशांतर करून पोलिसांनी पकडले, चौघांकडे सापडल्या ११७३ बनावट नोटा
सोलापूर (बारामती झटका)
बनावट नोटा तयार करणारी टोळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. पुणे जिल्ह्यातील उरुळी देवाची येथे बनावट नोटा घेऊन माढा, करमाळा सह इतर ठिकाणच्या बाजारात विक्रीसाठी निघालेल्या चौघांना वेशांतर करून थांबलेल्या पोलिसांनी रंगेहात पकडले. या चौघांकडून ११७३ बनावट नोटा जप्त केल्या असून १ लाख २३ हजार ३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, कुर्डूवाडी पोलीस ठाणे हद्दीत काही लोक बनावट नोटा बाळगून त्या विक्री करता बाजारात येणार असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टेंभुर्णी चौकात देशांतर करून सापळा रचला.
दरम्यान, एक व्यक्ती मोटर सायकलवरून येत असल्याची माहिती मिळाली. त्याला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या भारतीय चलनाच्या ४९३ बनावट नोटा मिळून आल्या.
याबाबत पोलिस हवालदार मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास वेगाने करीत असताना चार आरोपींना ताब्यात घेतले. या चौघांकडून बनावट नोटा बनवण्यासाठी वापरलेले साहित्य कम्प्युटर, प्रिंटर, कागद, शाई इत्यादी तपासात हस्तगत केले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, राजेश गायकवाड, बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, नीलकंठ जाधवर, सर्जेराव बोबडे, सलीम बागवान, आबासाहेब मुंढे, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, रवी माने, अनिस शेख, विनायक घोरपडे, दिलीप थोरात यांनी बजावली आहे.
चौघांना १५ डिसेंबर पर्यंत कोठडी
बनावट नोटा तयार करणारे हर्षल शिवाजी लोकरे वय २०, रा. कंदर, ता. करमाळा, सुभाष दिगंबर काळे वय २६ रा. भोसरे, ता. माढा, प्रभाकर उर्फ गणेश सदाशिव शिंदे वय ३८ रा. शाहूनगर, ता. माढा, पप्पू भारत पवार वय ३० रा. अर्जुन नगर, ता. करमाळा या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ डिसेंबर २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng