अकलूज आठवडा बाजाराची पाहणी : नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज

अकलूज (बारामती झटका)
अकलूज शहरातील पारंपरिक आठवडा बाजार हा परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांसाठी महत्त्वाचा व्यापार केंद्रबिंदू आहे. बाजारात दर आठवड्याला हजारो नागरिक खरेदीसाठी येत असल्याने त्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसूत्र सुविधा उपलब्ध करून देणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर अकलूज नगरपरिषदेच्या लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्षा सौ. रेश्माताई अडगळे आणि गटनेते तथा उपनगराध्यक्ष मा. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी आठवडा बाजाराची प्रत्यक्ष पाहणी करून विविध सुविधांचा आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान व्यापारी व ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. बाजार परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सार्वजनिक शौचालयांची स्थिती, वाहतूक व्यवस्था तसेच नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या मूलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली. बाजारातील वस्तूंचे दर, गुणवत्तेची पातळी आणि बाजारातील शिस्त याबाबतही प्रशासनाने माहिती घेतली.
व्यापाऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचनांची नोंद घेण्यात आली. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. बाजार परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहण्यासाठी नगरपरिषदेच्या विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
अकलूज नगरपरिषद नागरिकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेनुसार कार्यरत असून शहरातील प्रत्येक घटकाच्या समस्या जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध आहे. आठवडा बाजारासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नियमित पाहणी करून नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले.
“जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध अकलूज नगरपरिषद” या ध्येयवाक्यानुसार नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद सातत्याने कार्यरत आहे. नागरिक, व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयातून अकलूजचा आठवडा बाजार अधिक सुव्यवस्थित, स्वच्छ आणि आदर्श बाजारपेठ म्हणून विकसित करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



