मनीष अन् किरण देशमुखांच्या उपस्थितीत राजेंद्र राऊतांच्या विजयाचा निर्धार; कसबे बंधूंचा पालकमंत्र्यांनी केला आवर्जून उल्लेख..

सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ शहरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे महत्त्वपूर्ण संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, मनीष देशमुख, डॉ. किरण देशमुख, महानगरपालिका सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत महायुतीच्या विजयासाठी एकजुटीने काम करून महापालिकेतील नगरसेवकांपैकी शंभरहून अधिक मतदान देण्याचा निर्धार करण्यात आला.
बैठकीत उपस्थित मान्यवरांनी राज्यातील महायुती सरकारने राबविलेल्या विकासकामांचा आढावा घेत आगामी निवडणुकीत विकास, पारदर्शक प्रशासन आणि जनहिताच्या योजनांच्या बळावर मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विकासाची गती कायम राखली असून, राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
संवाद बैठकीत नगरसेवक, नगरसेविका, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रभावी नियोजनावर चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधून महायुतीची भूमिका आणि विकासाचा अजेंडा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीला मनीष देशमुख आणि किरण देशमुख हे दोन्ही युवा नेते उपस्थित होते आणि ते एकमेकांच्या शेजारी बसले होते. त्यामुळे मालक आणि बापूंच्या कार्यकर्त्यांमधून उत्साह दिसून आला.
दरम्यान या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे मोठे संख्येने नगरसेवक उपस्थित होते. तरीही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर कसबे बंधूंचा दशरथ भाऊ आणि गौतम कसबे यांचा विशेष उल्लेख केल्याचे दिसून आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



