तंत्रज्ञानताज्या बातम्यासामाजिक

बारामती येथे प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन (PSEA) बारामती रिजन सेंटर (LC-03) ची स्थापना

बारामती (बारामती झटका)

बांधकाम क्षेत्रातील गुणवत्ता, सुरक्षितता व तांत्रिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन (PSEA) चे बारामती रिजन सेंटर (LC-03) स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, फलटण, श्रीगोंदा आणि करमाळा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

वाढते नागरीकरण, उंच इमारती, औद्योगिक प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे संरचनात्मक सुरक्षिततेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. इमारतींचे योग्य स्ट्रक्चरल डिझाईन, दर्जेदार बांधकाम साहित्याचा वापर आणि भारतीय मानक संहितांचे (IS Codes) पालन ही सुरक्षित बांधकामाची मूलभूत तत्त्वे आहेत. या तत्त्वांविषयी समाज, बांधकाम व्यावसायिक, अभियंते, वास्तुविशारद आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

भारतातील भूकंपांच्या इतिहासाकडे पाहिल्यास सुरक्षित संरचनांचे महत्त्व अधोरेखित होते. सन १९९३ मध्ये झालेल्या लातूर-उस्मानाबाद भूकंपात हजारो इमारती कोसळल्या व मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. तसेच २००१ मधील गुजरातमधील भुज भूकंपानेही संरचनात्मक दोष, निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि तांत्रिक मार्गदर्शनाचा अभाव किती घातक ठरू शकतो हे स्पष्ट केले. या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर भूकंपरोधी डिझाईन, वैज्ञानिक बांधकाम पद्धती आणि पात्र स्ट्रक्चरल इंजिनिअर्सच्या मार्गदर्शनाखाली उभारलेली बांधकामे किती आवश्यक आहेत याची जाणीव निर्माण झाली आहे.

PSEA बारामती रिजन सेंटरच्या माध्यमातून सुरक्षित, भूकंपरोधी आणि गुणवत्तापूर्ण बांधकामासाठी जनजागृती अभियान, तांत्रिक कार्यशाळा, सेमिनार, प्रशिक्षण कार्यक्रम, संरचनात्मक अभियांत्रिकीविषयक मार्गदर्शन सत्रे, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन तसेच बांधकाम क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बांधकाम व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांना एकत्र आणून सुरक्षित व दर्जेदार बांधकाम संस्कृती विकसित करण्यासाठी केंद्र प्रयत्नशील राहणार आहे.

बारामती रिजन सेंटर (LC-03) च्या अध्यक्षपदी इंजि. दिलीप यादव, सचिवपदी इंजि. सुरज चांदगुडे आणि खजिनदारपदी इंजि. गौरव जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

केंद्राच्या व्यवस्थापन समितीमध्ये इंजि. संजय कदम, इंजि. रंजीत दोशी, इंजि. प्रज्ञा सिकची, इंजि. उमेश रणवरे आणि इंजि. लोकेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे तसेच बारामती रिजन सेंटरच्या तांत्रिक व धोरणात्मक कामकाजासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून इंजि. विकास निर्मल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुरक्षित बांधकाम, गुणवत्तापूर्ण संरचना आणि आपत्तीप्रतिरोधक विकास ही काळाची गरज असून, या दिशेने बारामती रिजन सेंटर महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

“सुरक्षित बांधकाम – सुरक्षित समाज” हा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच PSEA मुख्यकार्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम क्षेत्रात तांत्रिक उत्कृष्टता व व्यावसायिक मूल्ये रुजविणे हा केंद्राचा प्रमुख संकल्प आहे, अशी माहिती इंजि. दिलीप यादव यांनी दिली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button