पंढरपूरच्या विकासाला मोठी चालना; विशेष पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई (बारामती झटका)
श्री क्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखड्यातील तब्बल ₹. ३,९९३ कोटी ९० लाखांच्या विकासकामांना आता अधिक वेग मिळणार आहे.
पंढरपूरचे धार्मिक व पारंपरिक महत्त्व, वारकरी भाविकांची वाढती संख्या, स्थानिक परिस्थिती तसेच प्रस्तावित प्रकल्पाची तातडीची गरज लक्षात घेऊन हे विशेष पुनर्वसन धोरण तयार करण्यात आले आहे. प्रकल्पबाधितांना न्याय मिळावा, त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे आणि त्याचबरोबर श्री क्षेत्र पंढरपूरचा नियोजनबद्ध, आधुनिक व सर्वसमावेशक विकास साधता यावा, हा या धोरणाचा प्रमुख उद्देश आहे.
प्रकल्पबाधितांसाठी विशेष पॅकेज देण्याच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने हे धोरण तयार करून शासनाकडे सादर केले होते. त्यास आज मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने मंदिर परिसर विकासासह पंढरपूरच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार. तसेच पंढरपूरच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेही मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन आणि श्री क्षेत्र पंढरपूरचा नियोजनबद्ध विकास या दोन्ही बाबींना मोठी गती मिळणार असून, विठ्ठलाच्या नगरीच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



