खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश, कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागात वळविण्याच्या प्रकल्पासाठी २४.०५ कोटींच्या डीपीआरला प्रशासकीय मान्यता

मुंबई (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदारसंघासह दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा कृष्णा नदीचे अतिरिक्त पाणी नीरा नदीमार्गे उजनी धरणात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर मोठी गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षण, अन्वेषण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी राज्य शासनाने २४ कोटी ५ लाख ६७ हजार १२५ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय (GR) २२ जुलै २०२६ रोजी जलसंपदा विभागाने जारी केला.




या निर्णयामागे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरल्याची चर्चा आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प आणि कृष्णा नदीचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळविण्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे तसेच संबंधित विभागांकडे वारंवार लावून धरली होती. यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकींमध्येही त्यांनी हा विषय ठामपणे मांडला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे.

आशियाई विकास बँकेच्या (ADB) सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कृष्णा नदीवरील सापतेवाडी बंधाऱ्यापासून नीरा नदीवरील उद्घट बंधाऱ्यापर्यंत, तर दुसऱ्या टप्प्यात उद्घट बंधाऱ्यापासून थेट उजनी धरणापर्यंत पाणी वळविण्याचे नियोजन आहे. यासाठी आवश्यक सर्वेक्षण, डिझाइन आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम आता सुरू होणार आहे.


या प्रकल्पामुळे कृष्णा खोरे पाणी तंटा लवादाने महाराष्ट्राला मंजूर केलेल्या पाण्याचा अधिक प्रभावी वापर होणार असून कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच माढा परिसरातील दुष्काळी भागांना सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



दरम्यान, शासनाने प्रकल्प राबविताना लवादाच्या सर्व अटींचे काटेकोर पालन करण्याचे, उपलब्ध अर्थसंकल्पीय निधीतूनच खर्च करण्याचे आणि सर्व कामे पारदर्शक पद्धतीने करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



