ताज्या बातम्यासामाजिक

जिल्हाधिकाऱ्यांचे मन हेलावले; वयोवृद्ध वारकऱ्यांसाठी मोडला स्वतःचा आदेश

संवेदनशील कृती : थकलेल्या आजी-आजोबांना थेट घडविले विठुरायाचे दर्शन

सोलापूर (बारामती झटका) (लोकमत साभार)

आषाढी यात्रेच्या काळात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी घुसखोरी चालणार नाही. व्हीआयपी दर्शन बंद राहील, असे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले होते. परंतु मंगळवारी विठुरायाच्या दर्शन रांगेत थांबलेल्या मधुकर केचे (वय ८१) आणि पद्मा केचे (वय ७०) या दोन वयोवृद्ध वारकऱ्यांना पाहून त्यांचे मन हेलावले. या वृद्ध दाम्पत्याला त्यांनी विठुरायाचे थेट दर्शन घडवून दिले.

विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर येथील दर्शन मंडपात गेली आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दर्शन रांगेची पाहणी केली. या पाहणीवेळी एक आजी-आजोबा रांगेत थांबून होते. दोघेही शरीराने थकले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांची आस्थेने चौकशी केली. आम्ही विठ्ठलाचे दर्शन घेऊनच परत जाणार, असे दोघांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी कार्तिकेयन आणि औसेकर महाराज यांनी दोघांना थेट दर्शन घडविण्याचा निर्णय घेतला. कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या माध्यमातून दोघांना थेट गाभाऱ्यात नेण्यात आले. दर्शनानंतर दोघांनी समाधान व्यक्त केले.

आजीने मायेने फिरवला हात
विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी दहा तासांचा कालावधी लागतो. परंतु थकलेल्या आजी-आजोबांनी दर्शन घेऊनच जाण्याचा चंग बांधला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे थेट दर्शन घडविले. दर्शनाला जाण्यापूर्वी आजीने जिल्हाधिकाऱ्यांच्या डोक्यावर मायेचा हात फिरविला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button